.
उदगीर (प्रतिनिधी) वाचनसंस्कृती विकासासाठी सार्वजनिक ग्रंथालय ग्रामीण पातळीवर पाठीचा कणा आहे. त्यादृष्टीने वाचनालयाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेसोबतच वृत्तपत्रांनी देखील प्रयत्न करावेत. असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ बापूराव उर्फ गुलाब पटवारी यांनी केले. उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथे मातोश्री सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकीळे हे होते. तर प्रमुख अतिथी मध्ये जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे, कार्यवाह राम मेकले, कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे ,शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष श्रीमंत सोनाळे, तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, माजी तालुकाप्रमुख अंकुश कोनाळे, उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक रामभाऊ मोतीपवळे, ज्येष्ठ साहित्यिक एल पी उगिले, अरुण बिरादार, मनोज पाटील, बाळासाहेब वडले,युवा नेते शैलेश वडगावे, माधव बिरादार, गजानन नरहारे, बालाजी पाटील, गंगाधर नरहरे, अशोक खोडवे,रमेश साळुंके, गुप्तलिंग स्वामी, अनिल पाटील, नंदकुमार घोगरे, शादुल शेख ,हनुमंत भवाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना गुलाब पटवारी म्हणाले की, पत्रकारांनी सामाजिक प्रश्न प्राधान्याने मांडावेत. सद्यस्थितीत ग्रंथालय चळवळीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आपण सर्वतोपरी सहकार्य करू. शिवसेना ही लोककल्याणकारी योजना घेऊन चालणारी संघटना असल्यामुळे राज्यातील प्रत्येकाच्या हिताचे निर्णय घेतले जातील. यादृष्टीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मदतीला आता महाराष्ट्र ग्रंथालय सेना कार्यरत झाल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता ही शिवसेनेशी जोडला जाणार आहे. यामुळे निश्चितपणे सकारात्मक कार्य होईल. असे आश्वासन दिले.
उद्घाटक हावगीराव बेरकीळे यांनी सांगितले की, गेल्या बारा वर्षापासून ग्रंथालयाच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटना शासनाशी भांडत आहेत. विशेष करून 2012 नंतर ग्रंथालयाच्या अनुदानाचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न यासंदर्भात शासकीय पातळीवरून प्रचंड उदासीनता दिसून येते आहे. संघटना वेगवेगळ्या विचारसरणीला धरून असल्या तरीही मूळ प्रश्नाला धरून काम करत असल्यामुळे आपण सर्वजण मिळून ग्रंथालय चळवळीचे प्रश्न निकाली काढू. शिवसेनेने हा प्रश्न हाती घेतल्यामुळे निश्चितपणे ग्रंथालय चळवळीला न्याय मिळेल. असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष श्रीमंत सोनाळे, तालुकाप्रमुख टेंगेटोल चंद्रकांत ,ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे, शादुल शेख, राम मेकले, प्रभाकर कापसे, अनिल पाटील, रामभाऊ मोतीपवळे, यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा मातोश्री सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व मराठवाडा ग्रंथालय सेना प्रमुख दिनेश पाटील तीवटग्याळकर यांनी केले. प्रस्ताविक भाषणातून शिवसेनेच्या माध्यमातून आपण केलेले कार्य आणि भविष्यात ग्रंथालय संघटना अंतर्गत ग्रंथालय सेनेच्या माध्यमातून करावयाचे कार्य यासंदर्भात सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रमुख बी.जी. देशमुख आणि मार्गदर्शक शिल्पा सरपोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सूत्रसंचालन रामभाऊ मोतीपवळे यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामेश्वर बिरादार, यशवंत कुलकर्णी, प्रसाद शिरसे, छगन पाटील, बाळू पाटील, ज्ञानोबा पाटील, देवीदास पाटील, दत्तात्रय पाटील, नारायण पाटील, गोविंद पाटील, अमोल श्रीमंगले,तुळशीराम पाटील , सतिश पाटील,एकनाथ पाटील, अमोल पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.