अहमदपूर...... सध्या पुरवठा विभाग म्हटले की, संशयाचे ढग जमा व्हायला लागतात. या विभागात काम करणाऱ्या नवख्या दलाला पासून सेवक, कारकून, अधिकारी या सगळ्यांनाच चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. असे सर्रास अनुभव असल्याचे बोलले जात आहे. अहमदपूर तहसील साठी एक कर्तव्यकठोर आणि जांबाज तहसीलदार महेश सावंत यांनी या विभागावर अंकुश ठेवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला होता. या विभागातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणत त्यांनी एका रास्तभाव दुकानातून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यासाठी दिलेला शंभर कट्टे तांदूळ काळ्याबाजारात जात असताना पकडला होता. त्याच तांदळाच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तहसीलदार महेश सावंत यांनी अधिक तपास केला असता, तो तांदूळ अहमदपूर तालुक्यातील एका रास्त भाव दुकानदार यांचाच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर 19 मे 2020 रोजी या काळ्याबाजारात जाणाऱ्या तांदळा सह अवैध वाहतूक करणारा टेम्पो देखील जप्त करून संबंधितांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व व त्या अनुषंगाने लागू असलेल्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तांदळाचे अंदाजित बाजार मूल्य दीड लाख रुपये व टेम्पो चार लाख असा एकूण साडे पाच लाखाचा मुद्देमाल या कारवाईत पकडण्यात आला होता. कोरोणा च्या पार्श्वभूमीवर एका बाजूला गोरगरिबांच्या मदतीसाठी म्हणून दिला जाणारा हा तांदूळ, गैरमार्गाने काळ्याबाजारात आडत दुकानात जात असताना पकडला गेल्याने, संबंधिताच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्या रास्त भाव दुकानदाराचा दुकान परवाना निलंबित केला होता. त्यानंतर सदरील दुकान इतर कुणाला तरी संलग्न केले जाऊ नये, म्हणून संबंधित दुकानदार यांनी पुरवठा विभागाकडे विनंती करून आपल्या मर्जीतल्या दुकानाला हे निलंबित केलेल्या परवान्याची दुकान जोडले जावे. आणि आपला निलंबित केलेल्या परवाना,निलंबन रद्द करून पूर्ववत आपल्याला मान्यता मिळावी. यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नात त्यांनी लोकसेवक अहमदपूर येथील पुरवठा विभागात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले सुनील जयराम कांबळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी हे सर्व करून देण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागितल्याची तक्रार संबंधित तक्रारदारांनी लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांच्याकडे नोंदवली. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या प्रकरणाची शहानिशा करून दिनांक पाच ऑगस्ट 2020 रोजी पंचा समक्ष शहानिशा केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी दिनांक पाच ऑगस्ट रोजी ठरलेली रक्कम नायब तहसीलदार कांबळे यांना देण्यासाठी गेले असता दुपारी 03:31 च्या दरम्यान नायब तहसीलदार कांबळे यांनी 50 हजार रुपये पंचा समक्ष तहसील कार्यालय अहमदपूर येथील पुरवठा विभागाच्या कार्यालयात स्वतः स्वीकारले. त्यानंतर लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दिलेल्या तक्रारीनुसार अहमदपुर पोलीस स्टेशन येथे कलम 7 लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात माणिकराव बेद्रे ,बाबासाहेब काकडे, कुमार दराडे त्यांच्यासारख्या कर्तबगार अधिकार्यामुळे जनसामान्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण दिलेल्या तक्रारीची खातरजमा होउन आपल्याला न्याय मिळू शकतो. ही खात्री पटू लागल्यामुळे लातूर भागातील जास्तीत जास्त लोक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपल्या तक्रारी नोंदवत आहेत. अहमदपूर येथील प्रकरणात पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे हे तपास करत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक माणिकराव बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, कुमार दराडे, पोलीस हवालदार संजय पस्तापुरे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे! शिवकांता शेळके, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षिरसागर, अमोल शिंदे, संदीप जाधव, दीपक कलवले, रुपाली भोसले, राजू महाजन यांच्या पथकाने ही यशस्वी धाड टाकली. लातूर परिसरात कोणी लोकसेवक कोणाकडून काम करण्यासाठी लाचेची अगर बक्षिसाची मागणी करत असेल तर त्यांनी तात्काळ या संदर्भातली माहिती त्या लोक सेवकाने, अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने लाचेची मागणी करत असलेले संदेश, एस एम एस, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप असल्यास तात्काळ भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी. असेही आवाहन माणिकराव बेंद्रे यांनी केली आहे.