*डॉ. ना.य. डोळे यांनी डोळस वैचारिक दृष्टिकोन रुजवला** - प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांचे प्रतिपादन

.


लातूर:...... 


 डॉ.ना.य. डोळे सर हे थोर शिक्षण तज्ञ होते.त्यांची स्वतःची अशी समाजाभिमुख शैक्षणिक संकल्पना होती. महाराष्ट्रातील शिक्षण सुधारकांचा वारसा त्यांनी नेटाने चालवला. महाविद्यालये ही ज्ञानाची नव्हे तर परिवर्तनाची केंद्रे व्हावीत या अनुषंगाने त्यांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये आणि आपल्या शैक्षणिक भूमिकेतून विविध उपक्रम राबवले. विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असते या जाणिवेने वसा घेऊन व्रतस्थ वृत्तीने त्यांनी एक पिढी घडविण्याचे कार्य केले असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार ,लातूर यांनी व्यक्त केले.


थोर विचारवंत , छात्रभारती चे संस्थापक, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ना.य.डोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त इंडियन स्टुडंट्स कौन्सिल आणि दत्तगिरिजा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन फेसबुक व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. कुंभार बोलत होते.


 पुढे बोलताना डॉ. कुंभार यांनी डोळे सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. विद्यार्थ्यांनी केवळ वैयक्तिक करिअरकडे लक्ष देऊ नये तर समाज सक्षमीकरणाकडेही लक्ष दिले पाहिजे. सामाजिक भान असलेली पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य डोळे यांनी केले.भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी त्या पद्धतीचे संस्कार आणि वैचारिक लढाईसाठी सज्ज राहण्याची शिकवण डोळे यांनी आयुष्यभर दिली. ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा आणि समाजनिष्ठा आयुष्यभर जपणारे डॉ. डोळे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. ज्ञान हे जीवनाचे मूल्ये त्यांनी आयुष्यभर जगले तळमळ आणि उपयुक्तता ही त्यांच्या प्रशासनाची विशेष खासियत होती म्हणून आजही डॉ. डोळे यांचे शैक्षणिक जीवन व कार्य हे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असल्याचे उद्गार प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी या प्रसंगी काढले.


 आपल्या भाषणात पुढे प्राचार्य कुंभार म्हणाले की, डोळे यांनी शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय सांस्कृतिक सर्व क्षेत्रांमध्ये जबाबदारीने आणि सामाजिक भान ठेवून काम करणारी एक पिढी निर्माण केली. आज त्यांचे हजारो विद्यार्थी व वैचारिक वारसदार देश-विदेशात आपापल्या पद्धतीने सशक्तपणे कर्तव्यनिष्ठ माणूस घडविण्याचे काम करीत आहेत ही डोळे सर यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख आहे. 'डोळे स्कूल' नावाचा एक विचारप्रवाह आजही कांहीं पिढ्यांमध्ये जोपासला जातो. 


डॉ.ना.य.डोळे यांचे विचार काळाच्या पुढेचे होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय, धर्मनिरपेक्षता लोकशाही ,समाजवाद या मूल्यांवर डोळे यांचे निस्सीम प्रेम होते. लोकशाहीमध्ये व्यक्ती प्रतिष्ठा मुख्य भाग असतो.कुटुंब, धर्म, वंश, वर्ण, जात, प्रांत, असे कोणतेही घटक मुख्य असूच शकत नाहीत. व्यक्तीचे व्यक्ती म्हणून मुल्य संपत असेल तर लोकशाहीचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा डॉ. डोळ्यांच्या साहित्यसंपदेतून व भाषणातून मिळतो असेही प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी शेवटी सांगितले. या फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचे प्रस्ताविक इंडियन स्टूडेंट कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. डॉ.ज्ञानोबा कदम यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन 


दत्तगिरिजा प्रतिष्ठानच्या संस्थापिका प्रा. सुचिता गायकवाड यांनी केले.


 या ऑनलाइन फेसबुक व्याख्यानाचा लाभ चारहजार रसिकांनी घेतला.