.
उदगीर .... .
विवेक बुद्धीतून माणूसपण शोधत समग्र चळवळीविषयी अपार आस्था व कमालीची संवेदनशीलता जपत चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या वाट्याला येणाऱ्या निखाऱ्यावरची राख फुंकून घुमसत्या काळाचा तुकडा उजागर करणरी व तसेच सर्व पिडित, वंचितांचे जगणे आणि चळवळीच्या वाताहातीची उकल करणारी कादंबरी म्हणजे 'तसनस' ही होय.असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक वक्ते प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात' या चळवळी अंतर्गत संपन्न झालेल्या २३८ व्या वाचक संवादाचे अध्यक्षस्थान सौ.प्रतिभा राऊत यांनी भूषविले. यावेळी शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी येथील प्रा.डाॅ.ज्ञानदेव राऊत यांनी आसाराम लोमटे लिखित तसनस कादंबरीवर संवाद साधताना डॉ.राऊत म्हणाले,आसाराम लोमटे यांची लेखणी गटातटाच्या भिंतीत न घुटमळता स्वतंत्र प्रज्ञेचं, प्रतिभेचं अविष्करणं उभं करते. या लेखनाचं मोल संख्यात्मक मोजपट्टीपेक्षा गुणात्मक पातळीवर अत्यंत महत्त्वाचे असून वाचकांना विचारभिमुख करणारे आहे. त्यांच्या 'तसनस' कादंबरीतून शेतकरी, कामगार, दलित, स्त्रीया यांच्या घामाला दाम मागणार्या चळवळी उभ्या करण्याचे मौल्यवान विचार पेरणारी असल्यामुळे हि कादंबरी निश्चितच वाचकांवर प्रभाव टाकणारी आहे.
अभ्यासपूर्ण व मुद्देसूद मांडणीमुळे अत्यंत प्रभावी ठरलेल्या या वाचक संवादानंतर चर्चेत सहभागी सर्व वाचकांचे समाधान डॉ राऊत यांनी केले.यावेळी मान्यवरांना सन्मानचिन्ह व आभारपत्र देऊन गौरविण्यात आले. सौ. प्रतिभा राऊत यांनी अध्यक्षीय भाषणात स्त्रीयांना सन्मान मिळवून देणाऱ्या आसाराम लोमटे यांच्या 'लक्ष्मीमुक्ती' आंदोलनाचं कौतुक केलं. यानंतर कार्यक्रमाचे संयोजक अनंत कदम यांनी प्रास्ताविक संचलन केले तर आभार कु. तेजस्वीनी राऊत हिने मानले.याप्रसंगी कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन चळवळीच्या कार्यक्रमाच्या निरंतरपणात खंड पडूनये म्हणून फेसबुक लाईव्ह घेतला. यात तसनसचे लेखक दस्तुरखुद्द आसाराम लोमटे यांच्यासह संजय आवटे, कमल गेडाम, डॉ भाऊसाहेब मिस्तरी, सुरेंद्र पाटील,आबा महाजन, महेश मोरे, ऋषिकेश देशमुख, दिनकर महाजन, संजय बालाघाटे, मनिषा पाटील, संगिता मोरे, कु.अपूर्वा राऊत, विरभद्र मिरेवाड , सतीश हनेगावे आदिंसह अनेक जाणकारांनी सहभाग नोदवून उत्तम प्रतिसाद दिला.

