एस.एस.सी.बोर्डातील वाढीव गुण*

 .



एस एस सी बोर्ड परीक्षेत (इ.10 वी) विद्यार्थ्यांना कलाप्रकारातील वाढीव गुण मिळण्यासाठी शासनस्तरावरून काही शासन निर्णय निघाले आहेत. त्यापैकी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील दिनांक 24 नोव्हेंबर 2017, दिनांक 3 नोव्हेंबर 2018, व दिनांक 10 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णय नुसार शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित निकष या निर्णयाद्वारे सांगितले आहेत. क्रीडा क्षेत्र  सोबतच कला,चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग त्यांच्या भविष्याच्या प्रगती पदासाठी होणे आवश्यक आहे. तसेच लोककला हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे लोककलेची वाढ व संवर्धन करण्याचे काम अनेक शालेय विद्यार्थी करीत असतात. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.(10 वी) परीक्षेमध्ये क्रीडा गुणाच्या धर्तीवर शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यासंदर्भात शासन निर्णय घेतले आहे.


 *शास्त्रीय कला*


 या कला प्रकारात गायन वादन व नृत्य यांचा समावेश होतो. या तीन कला पैकी एका कलाप्रकारात सलग 3 परीक्षा उत्तीर्ण असल्यास व त्या परीक्षेत ए प्लस किंवा एक ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्याला 10 गुण वाढीव मिळतात. तसेच जर तो विद्यार्थी सलग 5 परीक्षा उत्तीर्ण असल्यास व ए ग्रेड अथवा ए प्लस मध्ये उत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यास 15 गुण दिले जाते. जर तो द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्यास त्यास 10 गुण मिळतात.


*बालनाट्य स्पर्धा*


राज्य शासनातर्फे घेण्यात येणारे बाल नाट्य स्पर्धेत विभागस्तरावर किंवा वैयक्तिक प्रथम क्रमांक किंवा सुवर्णपदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास 5 गुण अतिरीक्त(वाढीव गुण) देण्यात येते.


*चित्रपट पुरस्कार*


राष्ट्रीय स्तरावरील चित्रपटासाठी दिला जाणारा अभिनय पुरस्कार वैयक्तिक पातळीवर प्राप्त होणाऱ्या बालकलाकारास 10 गुण अतिरिक्त गुण म्हणून देण्यात येते. तसेच चित्रपटासाठी राज्यस्तरावर प्रस्तुत पुरस्कार वैयक्तिक पातळीवर प्राप्त होणाऱ्या बालकलाकाराला 5 गुण अतिरिक्त(वाढीव गुण) म्हणून देण्यात येते.


*लोककला*


शालेय स्तरावर एखादा विद्यार्थी लोककला प्रकारात किमान 50 प्रयोग सादर केलेला असेल अथवा निर्मितीच्या घटकास त्याचा सहभाग असेल अशा विद्यार्थ्याकडे मान्यताप्राप्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या संस्थेची मान्यता असलेल्या संस्थेचे प्रमाणपत्र असेल तर अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त 10 गुण मिळतात.(जर 25पेक्षाजास्त व 50पेक्षा कमी प्रयोग सादर केले असेल तर 5गुण वाढीव मिळतात.)


*चित्रकला*


चित्रकला कलाप्रकारात वाढीव गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी दोन्हीपैकी एकच परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्या विद्यार्थ्यास अतिरिक्त गुण दिले जात नाहीत. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत  मिळणाऱ्या ग्रेड वरच वाढीव गुण दिले जाते.यामध्ये ए ग्रेडला 7, गुण बी ग्रेड 5 गुण, सी ग्रेड 3 गुण अशा पद्धतीने वाढीव गुण मिळतात.


*स्काऊट व गाईड*


राज्यपाल पदक प्राप्त विद्यार्थी 3गुण, राष्ट्रपती पदक अथवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबीर सहभागास 10 गुण अतिरिक्त गुण दिले जाते.

*एन सी सी*

 प्रकारात 

बेसिक लिडर.शिप कँप(बी.एल.सी.)3 गुण,पूर्व प्रजासत्ताक दिन शिबीर (प्री.आर.डी.कँप)5 गुण,प्रजासत्ताक दिन सांचलन राष्ट्रीय स्तर शिबीर /संलग्न स्पर्धा सहभाग 10 गुण,प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबीर/सलग्न स्पर्धा पदक विजेत्यास 15गुण व आंतरराष्ट्रीय युथ एक्सेंचेंज प्रोग्राम सहभाग 20 गुण अशा प्रकारे अतिरिक्त गुण मिळतात.


*क्रीडा क्षेत्र*

क्रीडा क्षेत्रात जिल्हास्तर (प्रथम,द्वितीय,तृतीय) पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांस 5गुण,विभागस्तर पुरस्कारास 10 गुण, राज्यस्तरीय पुरस्कार 15 गुण,राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारास 20 गुण तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारास 25 गुण अतिरिक्त (वाढीव)गुण दिले जाते.


वरील कला प्रकारातील वाढीव गुण मिळविण्यासाठी संबंधित मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या  मूळ प्रमाणपत्र, सही शिक्यासह दोन प्रतींमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावयाचे असते. व शाळेमार्फत बोर्डाने दिलेल्या वेळेत शाळेने बोर्डाकडे दाखल करावयाचे असते. तेव्हाच या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळतात.दिलेल्या वाढिव गुणाच्या प्रस्तावात जर त्रुटी आढळून आल्यास( चुकीचे नाव,ओव्हर रायटिंग,) संबधित विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जात नाहीत. वरील सर्व कला व क्रीडा प्रकारापैकी कोणत्याही एकाच सर्वात जास्त वाढीव गुण कशास आहेत त्या कला प्रकारातील वाढीव गुण एस एस सी बोर्ड कडून विद्यार्थ्यांना मिळतात. पण नियमानुसार विद्यार्थ्यांने ज्या कला प्रकारात जास्तीचे गुण आहेत तोच वाढीव गुणासाठी प्रस्ताव दाखल करावयाचे हवे.या प्रस्तावातील सर्व मूळ प्रमाणपत्र बोर्ड जमा करुन घेतो व निकाल लागल्यावर  सनद सोबत प्रमाणपत्र परत दिले जाते.


             महादेव शरणप्पा खळुरे 

                 कलाध्यापक 

        यशवंत विद्यालय अहमदपूर 

         8796665555